
फुलांसोबत उमलणारी मुले
शिकणे हे फक्त मेंदूमध्ये माहितीचा साठा करण्यासाठी नाही तर विचार करायला शिकण्यासाठी, प्रश्न पडण्यासाठी व त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी असायला हवं असं वाटतं. जसं काम सुरू केलं तेव्हापासून या गोष्टी शिकत आहोत आणि त्याप्रमाणे मुलांसोबत काम करण्याचा प्रयत्न देखील करत आहोत. परंतु सुट्ट्यांमध्ये सायलीने घेतलेल्या कार्यशाळेमुळे त्यात अधिक स्पष्टता आली व मुलांसोबत प्रत्यक्षात कसे काम करायचे हे लक्षात आले.
अगदी एखाद्या छोट्या निरीक्षणावरून, प्रश्नावरून, घटनेवरून तसंच सोप्या प्रयोगातून देखील आपण मुलांना भरपूर विचार करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आणि त्यासाठी कागदी उमलणारे फुल ही ऍक्टिव्हिटी मुलांसोबत घेण्याचे ठरवले. सुरुवातीला आम्ही टीमने ती ऍक्टिव्हिटी करून बघितली व त्यावर चर्चा केली आणि मुलांसोबत घेण्यासाठी तिचे टेम्पलेट तयार केले. याआधी काही वेळेस ही ऍक्टिव्हिटी घेतली होती पण तेव्हा प्रात्यक्षिक करणे व त्यामागचे विज्ञान समजून घेणे यावर जास्त भर असायचा. पण आता मुलांना विचार करण्याची जास्त संधी देण्याचा तसेच त्यांच्या वैज्ञानिक कौशल्यांवर काम करण्याचा मुख्य हेतू होता. बऱ्याच मुलांना पाकळ्या दुमडलेलं कागदी फुल पाण्यात टाकलं की काय होतं हे माहिती होतं. पण जेव्हा पहिल्यांदाच पाण्यात टाकलेले फुल मुलं उमलताना पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आश्चर्य आणि आनंद बघून आपल्याला पण छान वाटतं.
तर मग आमची प्रत्यक्षात सत्राला सुरुवात झाली. सगळ्यात आधी कागदाचे फुल कसे बनवायचे इथपासून, फुल बनवण्यासाठी चौरस आकाराचा कागद लागतो पण मुलांना आयत आकाराचा कागद दिला होता. मग आयताचा चौरस कसा बनवायचा, आयत व चौरस मध्ये काय फरक आहे अशा गोष्टींवर चर्चा झाली आणि मग प्रत्येक मुला मुलींनी कागदी फुल बनवले. बऱ्याच जणांना कागदी फुल पाण्यात टाकले की काय होते हे माहिती होते तरी त्यांना यावेळेस काही वेगळे दिसते का व अजून बारकाईने निरीक्षण करण्यास सुचवले. नंतर सगळ्यांनी आपली निरीक्षणे सांगितली व ती फळ्यावर लिहिली. जसे की, कागद मध्यभागापासून टोकाकडे ओला होत गेला, कागद पाणी शोषत होता, सगळ्या पाकळ्या एकाच वेळेस उमलल्या नाही तसच
शेवटी दुमडलेली पाकळी सगळ्यात आधी उमलली अशी छोटी मोठी निरीक्षणे मुलांनी सांगितले. मग मुलांना विचारले की तुम्ही केलेल्या या निरीक्षणावरून तुम्हाला काही प्रश्न पडत आहेत का? मुलांनी विचार करून प्रश्न सांगायला सुरुवात केली, १) पाण्याऐवजी इंजिन ऑइल, दूध, तेल, गढूळ पाणी, विनेगर, मिठाचे पाणी, साखरेचे पाणी वापरले तर काय होईल? २) पाकळ्यांची संख्या कमी जास्त केली तर काही फरक पडेल का ३) कागदी फुलाच्या मध्यभागी छोटे छोटे छिद्र केले तर ४) वेगवेगळ्या प्रकारचे कागद घेतले तर काय होईल? मुलांचे प्रश्न सांगून झाल्यानंतर मग एक एक निरीक्षण घेऊन त्यावर चर्चा केली- पाण्याऐवजी जर तेल घेतले तर फुल उमलायला वेळ लागेल कारण तेल पाण्यापेक्षा घट्ट असते, गढूळ पाण्यात पण फुल उमलायला वेळ लागेल कारण त्यात मातीचे कण असतील आणि ते कागदाच्या छिद्रात जातील म्हणून वेळ लागेल. कमी पाकळ्या केल्या तर फुल लवकर उमलेल. फुलाच्या मध्यभागी छिद्र केले तर कागद कागद जास्त पाणी शोषून घेईल आणि त्यामुळे फुल पटकन उमलेल असं काही जणांना वाटलं. निरीक्षणावरून असे बरेच अंदाज मुलांनी सांगितले. नंतर मुलांना विचारले की यावरून तुम्हाला प्रयोगातले कोणते घटक जास्त महत्त्वाचे वाटतात की ज्याच्यात बदल केले तर निरीक्षणात पण बदल होऊ शकतात मग त्यावर मुलांनी सांगितले पाणी, कागदाचा प्रकार, आकार या गोष्टी बदलल्या तर निरीक्षणात पण बदल होऊ शकतील. आणि मग त्यादिवशी मुलांना घरी साबणाच्या आणि गढूळ पाण्यात प्रयोग करण्याचे सुचवले. काही मुलांनी घरी प्रयोग करून पाहिला व दुसऱ्या दिवशी त्याबद्दल सांगितले.
दुसऱ्या दिवशी मुलांचे तीन गट केले व प्रत्येक गटाला प्रयोगातील एका एका घटकात बदल करून प्रयोग करून बघितले व काय बदल होतात हे अभ्यासले. सुरुवातीला प्रयोग करण्याच्या आधी मुलांना त्यांचा अंदाज विचार करायला लावला आणि लिहून ठेवण्यास सांगितला. नंतर प्रत्येक गटाने मोजमाप करून फुल बनवली व त्यांना दिलेल्या घटकात बदल करून चार ते पाच वेळेस प्रयोग करून बघितले. मुलं गटामध्ये काम करत असताना ते फुलांचे आकार वेगवेगळे कसे घेणार, कागद कोणत्या प्रकारचे वापरणार, पाकळ्यांची संख्या कमी जास्त कशी करणार अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रयोगात केलेल्या बदलानुसार लागणाऱ्या वेळ त्यांनी नोंदवला, निरीक्षणे करून नोंदवली, निरीक्षणावरून आणखी प्रश्न पडले तर तसा बदल करून पुन्हा प्रयोग केले. प्रत्यक्षात प्रयोग करून बघितल्यानंतर त्यांना काय गोष्टी समजल्या हे लिहिले. सर्वांना गटात काम करायला, त्यांना वाटणारे बदल करून बघायला पुरेसा वेळ दिला. आणि शेवटी मग प्रत्येक गटाने इतर सगळ्यांना त्यांनी कसे प्रयोग केले, मोजमाप कसे घेतले, निरीक्षणे काय होती, आलेल्या अडचणी व त्यावर शोधलेला उपाय, केलेला अंदाज आणि प्रत्यक्षातल्या नोंदी यातली तफावत याबद्दल सांगितले.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांच्या निरीक्षण करणे, प्रश्न पडणे, अंदाज करणे, प्रयोग करून बघणे, नोंदी घेणे व मोजमाप करणे या वैज्ञानिक कौशल्यांवर काम करण्याची संधी मिळाली. अशा पद्धतीने शिक्षणात काम करताना मुलांच्या बरोबरीने आपण पण खूप काही शिकतो, आणि त्यामुळे फुलांसोबत उमलणाऱ्या मुलांसह आपणही उमलत राहतो.
धन्यवाद!
