
तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपण लहानपणापासून अनेकदा ऐकली असेल आणि आता आपल्या लहान मुलांनाही सांगत असू. पण ही गोष्ट ऐकून कधी आपल्याला प्रश्न पडतात का?
कदाचित मुलांना असे काही प्रश्न पडत देखील असतील. जसे की खरंच असं होऊ शकतं का? दगड टाकल्यावर पाणी पूर्णपणे वर येऊ शकेल का? दगड टाकल्यावर पाणी वर का येत असेल? पाणी पूर्ण वरती येण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत? दगडा ऐवजी पाण्यात इतर वेगवेगळ्या वस्तू टाकल्या तर काय फरक पडेल? असे कितीतरी प्रश्न पडू शकतात. या प्रश्नांची उत्तरे शोधताना प्रयोग करत चर्चा करत काही वैज्ञानिक संकल्पना मोजमाप करणे अशा गोष्टी नकळतपणे शिकायला मिळतात.
ही ऍक्टिव्हिटी मुलांबरोबर घेण्याआधी असं वाटत होतं की हे खूपच सोप्प आहे म्हणून आधी करून बघण्याची काहीच गरज वाटत नव्हती. पण या आधीचा काही वेळेसचा असा अनुभव होता की आपल्याला सोप्या वाटणाऱ्या प्रयोगावर पण अनेक प्रश्न पडू शकतात आणि त्याची उत्तरे मिळवण्यासाठी अगोदर आपण प्रयोग करून बघणे फार गरजेचे आहे. त्यामुळे ही कावळ्याच्या गोष्टीची ऍक्टिव्हिटी मुलांबरोबर घेण्याआधी आम्ही करून बघण्याचे ठरवले.
सुरुवातीला फक्त गोष्ट पडताळून बघणे इतकाच उद्देश विचारांमध्ये होता. म्हणून एका काचेच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्यात गोटया टाकल्या तेव्हा पाण्याची पातळी तर थोडी वाढली पण पूर्ण वरपर्यंत पाणी आले नाही. नंतर असा विचार आला की सगळ्या गोट्यांचा आकार सारखाच आहे त्यामुळे त्या गोट्यांमध्ये सारखीच जागा शिल्लक राहत असेल. म्हणून जवळपास गोट्यांच्याच आकाराचे दगड टाकून बघूया काय होतं ते असं ठरवलं. सुरुवातीची पाण्याची पातळी मात्र अधि इतकीच ठेवली. पण पाण्यात दगड टाकल्यानंतरही पाण्याच्या पातळीत फार काही वाढ झाली नाही. मग वाटले की पाण्याची पातळी वाढवून बघू काय होतं ते. आधीपेक्षा दुप्पट म्हणजे ४ सेंटीमीटर पर्यंत भांड्यात पाणी ओतले आणि त्यात परत दगड गोत्या टाकून पाहिलं, नक्कीच पाण्याची पातळी आधीपेक्षा तर वाढली पण तरीही पूर्णपणे पाणी वर आले नाही म्हणजे कावळ्याला काही पाणी पिता येणार नाही. मग अजून दोन वेळेस दोन दोन सेंटीमीटरने पाण्याची पातळी वाढवून प्रयोग करून बघितला तर पाणी वर पर्यंत आले. म्हणजे पाणी वरती येण्यासाठी दगड गोटया आणि पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे हे लक्षात आले.
गोट्यांपेक्षा लहान आकारांचे दगड पाण्यात टाकले तर पाण्याची पातळी वाढेल का असा प्रश्न पडला आणि मग परत ते पडताळून बघण्यासाठी लहान लहान दगड टाकून पाहिले आणि यावेळेस गोट्यांपेक्षा जास्त पाण्याची पातळी वरती आली. मग असा विचार आला की वाळूचे कण तर आणखीन लहान लहान असतात त्यामुळे अगदी छोट्या छोट्या दोन दगडातील जागा कमी राहील आणि त्यामुळे पाणी जास्त वर येऊ शकते. नंतर सारख्याच आकाराचे तीन भांडे घेऊन तीनही भांड्यात चार सेंटीमीटर पर्यंत पाणी ओतले. सारख्याच आकारांच्या वाट्यात ठेवलेले गोटया, छोटे दगड व वाळू प्रत्येकी एका एका भांड्यात टाकले. यावरून असे लक्षात आले की वाळू असणाऱ्या भांड्यातील पाण्याची पातळी जास्त वर आली आहे त्यानंतर मग छोट्या दगडांच्या भांड्यातील आणि सगळ्यात कमी गोटया असलेल्या भांड्यातील पाण्याची पातळी वर आली होती.
हे करण्याआधी मुलांना आपण अंदाज करायला सांगू शकतो की यापैकी कोणत्या वस्तू पाण्यात टाकल्यावर पाण्याची पातळी जास्त वरती येईल? मध्येच असा विचारही येऊन गेला की पण कावळा त्याच्या चोचीने किती वाळू उचलेल आणि कसा माठात टाकू शकेल? पण प्रयोग करून बघायला कावळा नाही तर म्हणत नाहीय न! जे वाटते ते आपण नक्कीच करून बघू शकतो.
तसंच दगड टाकल्यानंतर पाण्याची पातळी वाढते म्हणजे नक्की काय होत असेल? पाणी वरती येते म्हणजे आपण त्यात आणखी पाण्याची भर घालतो का? तर नक्कीच नाही. पाण्यात दगड टाकल्यानंतर प्रत्येक दगड पाणी बाजूला करून जागा घेतो व बाजूला झालेले पाणी भांड्यातील रिकामी जागा घेते म्हणून भांड्यातील पाणी वर येते. हीच गोष्ट आपण मुलांना एक टास्क म्हणून पण देऊ शकतो, जसे या भांड्यात आणखी पाणी न होता तुम्हाला यातील पाणी भांड्यात वरती आणून दाखवायचे आहे कसे कराल? नंतर शेवटी ऑफिसमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू पाण्यात टाकून पाणी किती वर येते हे बघितले.
आपण स्वतः जर प्रयोग करून पाहिले तर वेगवेगळी छोटी निरीक्षणे आपल्या लक्षात येतात, आणि त्या आधारे आपण मुलांना विविध प्रश्न विचारून अनेक वेळा विचार करण्याची संधी देऊ शकतो. तसंच एकाच प्रयोगात छोटे छोटे बदल करून तोच प्रयोग परत परत केला तर काय बदल होतात हे लक्षात येते. आणि अशा प्रकारच्या पूर्वतयारीमुळे प्रत्यक्षात सत्र घेताना आपण अधिक चांगल्या प्रकारे मुलांना विचार करण्याची व शिकण्याची संधी देऊ शकतो.
