आवाज आपल्यापर्यंत कसा पोहोचतो ?🤔
आम्ही मुलांसोबत चर्चा करताना कशा पद्धतीने ती चर्चा पुढे नेतो याचा तुम्हालाही अनुभव येण्यासाठी एक घटना तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटते .
त्या दिवशी सकाळी स्पीकरवर गाणे🎵 लावले होते. थोड्या वेळाने अभंग आला ( अभंग आमचा ६ वर्षांचा मुलगा आहे) आणि तो म्हणाला की, मला खालच्या मजल्यावर पण गाणे ऐकू येत होते. मग मी त्याला म्हणालो, “अरे वा! पण आवाज खालपर्यंत कसा आला असेल रे?” तर तो म्हणाला, “खिडकीतून खाली आला असेल आणि त्या रूमला दरवाजा आहे त्यातून पण आला असेल”. मग आमच्यातील पुढील संवाद पुढील प्रमाणे होता,
मी : बरोबर ! बरं मग आवाज तर इथे तयार होतोय मग तो खाली कसा पोहोचला असेल तुझ्यापर्यंत ? म्हणजे बघ आपण बटण दाबल्यावर लाईट कसा लागतो, बटणापासून वीज लाईटपर्यंत कशी पोहोचते ?
अभंग : वायर जोडलेली असते तिच्यातून वीज बल्बपर्यंत पोहोचत असेल.
मी : बरोबर ! मग तसंच स्पीकर आणि तुझे कान यांच्यामध्ये असं काय असेल त्याच्यामुळे स्पीकर जवळ तयार झालेला आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचत असेल ?
अभंग : मला नाही माहिती काय असेल 😒
मी : बरं, मग मला सांग आपल्या आजूबाजूला काय आहे जे भरपूर प्रमाणात आहे ?
अभंग : झाडं आहेत .
मी : जरा हसून ☺️ म्हणालो बरं, आपल्या आजूबाजूला असं काय आहे जे सगळीकडे आहे पण ते आपल्याला दिसत नाही?
अभंग : देव आहे !
मी : आणखी हसायला आले 😀 . बरं, असं काय आहे जे आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात आहे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याचा वापर आपण सतत करत असतो. आता पण तू त्याचा वापर करतो आहेस.
अभंग : नाही माहित .
मी : तू नाकाने काय आत घेतो आहेस ?
अभंग : हवा मध्ये घेतो आहे .
मी : बरोबर ! मग ती आपल्या आजूबाजूला असलेली हवा आहे ना तिच्यामधून आवाज स्पीकर पासून तुझ्या कानांपर्यंत आला . बर मग मला सांग जिथे हवाच नसेल तिथे तुला आवाज येईल का ?
अभंग : नाही येणार .
म्हणजेच वरील उदाहरणात नवीन शिकण्याची प्रक्रीया आम्ही अभंगला जे माहितीये त्याच्याकडून जे माहित नाही त्याकडे केली. इंग्रजीत याला Journey from Known to Unknown असे म्हणतात . हीच प्रक्रीया आम्ही वर्गातपण विद्यार्थ्यांसोबत नेहमीच वापरतो . त्यासाठी तास घेण्याआधी आम्ही त्यावर खूप विचार करतो, एकमेकांसोबत चर्चा करतो, तज्ञ लोकांची – पुस्तकांची आणि गरज भासली तर इंटरनेटचीही मदत घेतो . एकच ध्यास असतो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विचार करण्याची आणि चर्चेत सहभागी कसे करून घेता येईल .
धन्यवाद 🙏🏽🤗 – अनिरुद्ध पाटील
